वाट सापडत नसताना आपल्या मुलांना योग्य मार्ग दाखवणारे ते बाबा असतात. आपल्या मुलाला बोट धरुन चालायला शिकवणारे ते बाबा असतात. खरंच स्वतःला दिवसरात्र कामात गुंतवून आपल्या मुलांना आनंदात ठेवणारे ते बाबा असतात. सतत तुम्हाला प्रोत्साहन देणारे बाबा असतात. कधी कठोर तर कधी एखाद्या मित्रा सारखे वाटणारे ते बाबा असतात. बाबा असतात स्वतःची आवड बाजुला ठेवुन मुलांची आवड पुर्ण करणारे कारण आपल्या मुलांच्या डोळ्यात अश्रु पाहु न शकणारे ते बाबाच असतात.
मला आठवत मी लहानपणी बाबांच्या सायकलवर बसुन बाहेर मस्त फिरायला जायचो तेव्हा एखादं खेळणं दिसलं की मी ते घेण्याचा हट्ट करायचो आणि बाबा ते मला घेऊनही द्यायचे. अशी कित्येक खेळणी आजही तशीच आहेत जपुन ठेवलेली. कारण आपल्या छोट्या छोट्या गोष्टीत स्वतःचा आनंद पहाणारे ते बाबाच असतात. आजही त्या खेळण्याकडे पाहिलं की मला त्या सर्व गोष्टी आठवतात. पण जस जस मोठं होतं जातो तसे वडील आणि मुलगा यांच्यातली एक सज्ञा बदलत जाते.
एक मित्र म्हणुन बाबांनकडे पहाताना त्याच्यातले वेगळेच व्यक्तीमत्व जाणवते. आता हट्ट नाही तर जिद्द, चिकाटी आणि काहीतरी स्वतः मिळवण्याची ताकद त्याच्याकडुन मिळते. चर्चा, वादविवाद अशा कित्येक गोष्टी आमच्यात होतात. आपले विचार स्वतंत्र आणि निर्भीड असावे असा त्याचा अट्टाहास असतो. अगदी कित्येक गोष्टीत, विचारात आमची चर्चा होते. एक मार्गदर्शक म्हणून बाबांनकडे पहाताना एक वेगळीच त्याची ओळख होते. आणि एक मित्र म्हणून योग्य सल्ला देणारेही ते आपले बाबांच असतात.
बाबा असतात सतत आपल्या बरोबर अगदी सावली सारखे. एक शिक्षक म्हणुन, एक मित्र बनुन , एक मार्गदर्शक म्हणुन आणि एक सोबती होउन. अस म्हणतात मुलगा कितीही मोठा झाला तरी तो आईवडिलांना लहानच असतो. पण मी म्हणतो मोठं व्हावंच कशाला. बाबां सोबत सायकलवर फिरायला आजही जावं असंच वाटतं. कारण कितीही मोठं झालं तरी जाच्या समोर पुन्हा लहान व्हावंस वाटतं ते बाबाच असतात...
बाबा...
रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग, खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply