मुख्य सामग्रीवर वगळा

श्री स्वामी समर्थ आरती || काकड आरती || शेजारती || Shree Swami Samarth ||


* आरती *


जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था।
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा।।धृ।।

छेलि खेडे ग्रामी तु अवतरलासी, राया अवतरलासी।
जग्दउध्दारासाठी राया तु फिरसी।
भक्तवत्सल खरा तु एक होसी,
राया एक होसी।
म्हणुनी शरण आलो तव चरणासी।
जय देव, जय देव०॥१॥

त्रैगुण-परब्रम्ह तुझा अवतार,
तुझा अवतार।
त्याची काय वर्णु लिला पामर।
शेशादिक क्षीणले नलगे त्या पार,
नलगे त्या पार।
तेथे जडमुढ कैसा करु मी विस्तार।
जय देव, जय देव०॥२॥

देवाधिदेवा तु स्वामी राया,
तु स्वामी राया।
निरजर मुनीजन ध्याती भावे तव पाया।
तुझसी अर्पण केली आपुली ही काया,
आपुली ही काया।
शरणागता तारी तु स्वामी राया।
जय देव, जय देव०॥३॥

अघटीत लिला करुनी जडमुढ उध्दारिले,
जडमुढ उध्दारिले।
किर्ती एकूनी कानी चरणी मी लोळे।
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले,
मज हे अनुभवले।
तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे।
जय देव, जय देव०॥४॥

* स्वामी समर्थ आरती *


आरती स्वामी राजा।
कोटी आदित्यतेजा।
तु गुरु मायबाप।
प्रभू अजानुभुजा।
आरती स्वामी राजा॥धृ॥

पुर्ण ब्रम्ह नारायण।
देव स्वामी समर्थ। 
कलीयुगी अक्कलकोटी।
आले वैकुंठ नायक। 
आरती स्वामी राजा॥१॥

लीलया उध्दरिले।
भोळे भाबडे जन। 
बहुतीव्र साधकासी।
केले आपुल्या समान। 
आरती स्वामी राजा॥२॥

अखंड प्रेम राहो|
नामी ध्यानी दयाळा।
 सत्यदेव सरस्वती। 
म्हणे आम्हा सांभाळा। 
आरती स्वामी राजा॥३॥

*  स्वामी समर्थ आरती दिंडोरी प्रणित *


जय जय सद्-गुरु स्वामी समर्था,
आरती करु गुरुवर्या रे।
अगाध महिमा तव चरणांचा,
वर्णाया मति दे यारे॥धृ॥

अक्कलकोटी वास करुनिया,
दाविली अघटित चर्या रे।
लीलापाशे बध्द करुनिया,
तोडिले भवभया रे॥१॥

यवन पूछिले स्वामी कहाॅ है,
अक्कलकोटी पहा रे।
समाधी सुख ते भोगुन बोले,
धन्य स्वामीवर्या रे॥२॥

जाणिसे मनीचे सर्व समर्था,
विनवू किती भव हरा रे।
इतुके देई दीनदयाळा,
नच तव पद अंतरा रे॥३॥

* स्वामी समर्थ आरती *


जय देव जय देव, जय जय अवधूता, हो स्वामी अवधूता।
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता।। जय देव जय देव॥धृ॥

तुमचे दर्शन होता जाती ही पापे।
स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते।
चरणी मस्तक ठेवूनि मनि समजा पुरते।
वैकुंठीचे सुख नाही या परते।।
जय देव जय देव॥१॥

सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा।
कर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळा।
शरणागत तुज होतां भय पडले काळा।
तुमचे दास करिती सेवा सोहळा।। जय देव जय देव॥२॥

मानवरुपी काया दिससी आम्हांस।
अक्कलकोटी केले यतिवेषे वास।
पूर्णब्रम्ह तूची अवतरलासी खास।
अज्ञानी जीवास विपरीत भास।। जय देव जय देव॥३॥

र्निगुण र्निविकार विश्वव्यापक।
स्थिरचर व्यापून अवघा उरलासी एक।
अनंत रुपे धरसी करणे नाएक।
तुझे गुण वर्णिता थकले विधीलेख।।
जय देव जय देव॥४॥

घडता अनंत जन्मे सुकृत हे गाठी।
त्याची ही फलप्राप्ती सद्-गुरुची भेटी।
सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी।
शरणागत दासावर करी कृपा दृष्टी।।
जय देव जय देव॥५॥

* काकड आरती *


ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती। स्वामी समर्थ तुजप्रती।
चरण दावी जगत्पते। स्मरतो तुझी अभिमूर्ती॥धृ॥

भक्तजन येऊनिया दारी उभे स्वामीराया। दारी उभे स्वामीराया।
चरण तुझे पहावया। तिष्ठती अती प्रीती॥१॥

भक्तांच्या कैवारी समर्था समर्थ तु निरधारी। समर्था समर्थ तु निरधारी।
भेट घेऊन चरणावरी। गातो आम्ही तुझी स्तुती॥२॥

पूर्णब्रम्ह देवाधिदेवा निरंजनी तुझा ठावा। निरंजनी तुझा ठावा।
भक्तासाठी देहभाव। तारिसी तु विश्वपती॥३॥

स्वामी तुची कृपाघन ऊठुन देई दर्शन। ऊठुन देई दर्शन।
स्वामीदास चरण वंदी। मागतसे भावभक्ती॥४॥

* कर्पुर आरती *


कापूराची वात ओवाळु तुजला, स्वामी ओवाळु तुजला।
देहभाव अहंकार सहजी जाळीला॥धृ॥

दया क्षमा शांती ह्या उजळल्या ज्योती, स्वामी उजळल्या ज्योती।
स्वयंप्रकाशरुप देखिली स्वामींची मुर्ती।। कापूराची वात०॥१॥

मी तु पण काजळ काजळी गेली, स्वामी काजळी गेली।
निजानंदे तनु पायी अर्पियली।। कापूराची वात०॥२॥

आनंदाने भावे कापूर्रारती केली, स्वामी कापूर्रारती केली।
पंचतत्व भाव तनु पायी अर्पियली।। कापूराची वात०॥३॥

* शेजारती *


आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता। स्वामी करा अवधूता। 
चिन्मय सुखधामी जाउनी, पहुडा एकांता॥धृ॥

वैराग्याचा कुंचा घेवूनी चौक झाडीला। स्वामी हो चौक झाडीला।
 तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला॥१॥

पायघड्या घातल्या सुंदर नवविध भक्ती। स्वामी नवविध भक्ती। 
ज्ञानाच्या समया उजळूनी लावियल्या ज्योती॥२॥

भावार्थाचा मंचक हृदयाकाशी टांगिला। हृदयाकाशी टांगिला।
 मनाची सुमने करुन गेला शेजेला॥३॥

द्वैताचे कपाट लावूनी एकत्र केले। गुरुने एकत्र केले। 
दुर्बुध्दीच्या गाठी सोडूनी पडदे सोडले॥४॥

आशा तृष्णा कल्पनांचा सांडूनी गलबला। गुरु हा सांडूनी गलबला।
 दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला॥५॥

अलक्ष उन्मन सेवूनी स्वामी नाजूक हा शेला। गुरु हा नाजूक शेला। 
निरंजन सद्-गुरु स्वामी निजे शेजेला॥६॥




* श्री स्वामी समर्थांची १०८ नावे *


ॐ दिगंबराय नमः,
ॐ वैराग्यांबराय नम:, 
ॐ ज्ञानांबराय नमः,
ॐ स्वानदांबराय नमः, 
ॐ अतिदिव्यतेजांबराय नमः,
ॐ काव्यशक्तिप्रदायिने नमः,
ॐ अमृतमंत्रदायिने नमः,
ॐ दिव्यज्ञानादत्ताय नमः,
ॐ दिव्यचक्षुदायिने नमः,
ॐ चित्ताकर्षणाय नमः,
ॐ चित्तशांताय नमः,
ॐ दिव्यानुसंधानप्रदायिने नमः,
ॐ सद्गुणविवर्धनाय नम: ,
ॐ अष्टसिध्दिदायकम नमः,
ॐ भक्तिवैराग्यदत्ताय नमः,
ॐ मुक्तिभुक्तिशक्तिप्रदायने नमः,
ॐ गर्वदहनाय नम:,
ॐ षङरिपुहरिताय नमः,
ॐ आत्मविज्ञानप्रेरकाय नमः,
ॐ अमृतानंददत्ताय नमः,
ॐ चैतन्यतेजसे नमः,
ॐ श्रीसमर्थयतये नमः,
ॐ भक्तसंरक्षकाय नम:,
ॐ अनंतकोटिब्रम्हांडप्रमुखाय नमः,
ॐ अवधूतदत्तात्रैय नम:,
ॐ चंचलेश्वराय नमः,
ॐ आजानुबाहवे नमः,
ॐ आदिगुरवे नम:,
ॐ श्रीपादवल्ल्भाय नमः,
ॐ नृसिंहभानुसरस्वत्ये नमः,
ॐ कुरवपुरवासिने नमः,
ॐ गंधर्वपुरवासिने नमः,
ॐ गिरनारवासिने नमः,
ॐ श्रीकौशल्यनिवासिने नम:,
ॐ ओंकारवासिने नमः,
ॐ आत्मसूर्याय नमः,
ॐ प्रखरतेजा प्रचतिने नमः,
ॐ अमोघतेजानंदाय नमः,
ॐ तेजोधराय नमः,
ॐ परमसिध्दयोगेश्वराय नमः,
ॐ स्वनंदकंदस्वामिने नमः,
ॐ स्मर्तृगामिने नमः,
ॐ कृष्णानंद अतिप्रियाय नमः,
ॐ योगिराजेश्वरया नम:,
ॐ भक्तचिंतामणिश्वराय नमः,
ॐ नित्यचिदानंदाय नमः,
ॐ अकारणकारुण्यमूर्तये नमः,
ॐ चिरंजीवचैत्यन्याय नमः,
ॐ अचिंत्यनिरंजनाय नमः,
ॐ दयानिधये नमः,
ॐ भक्तचिंतामणीश्वराय नमः,
ॐ शरणागतकवचाय नमः,
ॐ वेदस्फूर्तिदायिने नमः,
ॐ महामंत्रराजाय नमः,
ॐ अनाहतनादप्रदानाय नमः,
ॐ सुकोमलपादांबुजाय नमः,
ॐ चित्शक्यात्मने नमः,
ॐ अतिस्थिराय नमः,
ॐ माध्यन्हभिक्षाप्रियाय नमः,
ॐ प्रेमभिक्षांकिताय नमः,
ॐ योगक्षेमवाहिने नमः,
ॐ भक्तकल्पवृ़क्षाय नमः,
ॐ अनंतशक्तीसूत्रधराय नमः,
ॐ परब्रह्माय नमः,
ॐ अनितृप्तपरमतृप्ताय नमः,
ॐ स्वावलंबनसूत्रदाये नमः,
ॐ असमर्थसामर्थ्यदायिने नमः,
ॐ योगसिध्ददायकम नमः,
ॐ बाल्यभावप्रियांय नमः,
ॐ भक्तिनिधनाय नमः,
ॐ औदुंबरप्रियाय नमः,
ॐ यजसुंकोमतलनुधारकाय नम:,
ॐ त्रिमूर्तिध्वजधारकाय नमः,
ॐ चिदाकाशव्याप्ताय नमः,
ॐ केशरचंदनकस्तूरीसुगंधप्रियाय नमः,
ॐ साधक संजीवन्यै नमः, 
ॐ कुंडलिनीस्फूर्तिदात्रे नमः, 
ॐ अक्षरवालाय नमः, 
ॐ आनंदवर्धनाय नमः, 
ॐ सुखनिधानाय नमः,
ॐ उपमातिते नमः, 
ॐ भक्तिसंगीतप्रियाय नमः,
ॐ अकारणसिध्दिकृपाकारकाय नमः,
ॐ भवभयभंजनाय नमः,
ॐ स्मितहास्यानंदाय नमः,
ॐ संकल्पसिध्दाय नमः,
ॐ संकल्पसिध्दिदात्रे नमः,
ॐ सर्वबंधमोक्षदायकाय नमः,
ॐ ज्ञानातीतज्ञानभास्कराय नमः,
ॐ श्रीकिर्तीनाममंत्राभ्यों नमः,
ॐ अभयवरददायिने नमः,
ॐ गुरुलीलामृत धाराय नमः, 
ॐ गुरुलीलामृतधारकाय नमः,
ॐ वज्रसुकोमलहृदयधारिणे नमः,
ॐ सुविकल्पातीतसहजसमाधिभ्यों नमः,
ॐ निर्विकल्पातीतसहजसमाधिभ्यों नमः,
ॐ त्रिकालातीतत्रिकालज्ञानिने नमः,
ॐ भावातीतभावसमाधिभ्यों नमः,
ॐ ब्रंह्मातीत - अणुरेणुव्यापकाय नमः,
ॐ त्रिगुणातीतसगुणसाकारसुलक्षणाय नमः,
ॐ बंधनातीतभक्तिकिरणबंधाय नमः,
ॐ देहातीतसदेहदर्शनदायकाय नमः,
ॐ चिंतनातीतसदेहदर्शनदायकाय नमः,
ॐ मौनातीत - उन्मनीभावप्रियाय नमः,
ॐ बुध्दयतीतसद् बुध्दिप्रेरकाय नमः,
ॐ मत् प्रिय - पितामहसद् गुरुभ्यों नमः,
ॐ पवित्रमात्यसाहेबचरणाविदभ्यो नमःः

* श्री स्वामी समर्थ मानस पूजा *


|| श्रीगणेशाय नम: ||

नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ति रूपम || ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते ||

हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा || मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा || कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा || समर्था तुम्हा विण हो जीव तैसा || १ ||

स्वामी समर्था तुम्ही स्मतृगामी || हृदयासनी या बसा प्रार्थितो मी || पूजेचे यथासांग साहित्य केले || मखरांत स्वामी गुरू बैसविले || २ ||

महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती || जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ || परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ ||

सुवर्ण ताटी महारत्न ज्योती || ओवाळोनी अक्षता लावू मोती || शुभारंभ ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवूया मस्तकाला || ४ ||

हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा || तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा ।। प्रणिपात साष्टांग शरणागताचा || तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५ ||

ही ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा || शिव शंकराची असें शक्तिपूजा || दहीदुध शुद्धोदकाने तयाला || पंचामृती स्नान घालू प्रभूला || ६ ||

वीणा तुतार्‍या किती वाजताती || शंखादि वाद्ये पहा गर्जताती ।। म्हणती नगारे गुरूदेव दत्त || श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ ||

प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली || श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली।। महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया || महिमा तयांचा कळता जगा या || ८ ||

मीं धन्य झालो हे तीर्थ घेता || घडू दे पूजा ही यथासांग आता।। अजानबाहू भव्य कांती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज || ९ ||

प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया रेशिमी वस्त्र साज || सुगंधित भाळी टीळा रेखियेला || शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० ||

वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा || सुवास तो वाढवी भाव साचा || शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते || गुलाब जाई जुई अत्तराते || ११ ||

गंधाक्षता वाहूनीया पदाला || ही अर्पूया जीवन पुष्प माला || चरणी करांनी मिठी मारू देई || म्हणे लेकरासी सांभाळ आई || १२ ||

इथें लावुया केशर कस्तुरीचा || सुगंधीत हा धूप नानाप्रतिचा || पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली || गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली || १३ ||

करूणावतारी अवधूत कीर्ति || दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती || प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची || अशी दिव्यता स्वामी योगेश्र्वरांची || १४ ||

हृदमंदिराची ही स्नेह ज्योती || मला दाखवी स्वामिची योगमुर्ति || करू आरती आर्त भावे प्रभूची || गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५ ||

पंचारती ही असे पंचप्राण || ओवाळूनी ठेवू चरणा वरून || निघेना पुढें शब्द बोलू मी तोही || मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ ||

हे स्वामीराजा बसा भोजनाला || हा पंचपक्वान्न नैवेद्य केला || पुरणाची पोळी तुम्हा आवडीची || लाडू करंजी असें ही खव्याची || १७ ||

डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा || हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा || पुढें हात केला या लेकरानें || प्रसाद द्यावा आपुल्या करानें || १८ ||

तांबुल घ्यावा स्वामी समर्था || चरणाची सेवा करू द्यावी आता || प्रसन्नतेतून मागू मी काय || हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ ||

सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू || दुजी दक्षिणा मी तुम्हां काय देऊ || नको दूर लोटू आपुल्या मुलासी || कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० ||

धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला || पदी ठेवू दे शीर शरणा गताला || हृदयी भाव यावें असे तळमळीचे || करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे || २१ ||

तुझें बाळ पाही तुझी वाट देवा || नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा || मनी पूजनाची असे दिव्य ठेव || वसो माझीया अन्तरी स्वामी देव || २२ ||

|| श्री दत्तार्पणमस्तु || श्रीगुरूदेव दत्त ||



* समर्थ अष्टक *


असे पातकी मी स्वामी राया,
पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया.
नसे अन्य त्राता जागी या दिनाला,
समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला. 
मला माय ना बाप ना आप्त बंधू
सखा सोयरा सर्वे तू दीनबंधू
तुझा मात्र आधार या लेकराला
समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला.
नसे शास्त्र विद्या कालादीपक काही
नसे ज्ञान वैराग्य ते सर्वथा ही.
तुझे लेकरू ही अहंता मनाला
समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला.
प्रपंची पुरा बद्ध झालो दयाला,
तुझा दास मी ही स्मृती ना मनाला.
क्षमेची असे याचना त्वत्पादाला,
समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला.
मला काम क्रोधाधीकी नागविले
म्हणोनी समर्था तुला जागविले.
नको दूर लोटू तुझ्या सेवकाला,
समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला.
नको अंत पाहू त्वरे धाव घेई 
तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ट आई.
अनाथासि आधार तुझा दयाला,
समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला.
कधी गोड वाणी न येई मुखाला,
कधी द्रव्य न अर्पिले याचकाला.
कधी मूर्ती तुझी न ये लोचानाला,
समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला.
मला एवढी घाल भिक्षा समर्था,
मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा. 
घडो पाद सेवा तुझ्या किंकराला,
समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...