"अडगळीतली वही !"
आज जुन्या पुस्तकात मला माझी जुनी वही सापडली. धुळीत पडलेली ती वही नकळत हातात आली आणि त्यातील एक एक ओळ वाचताना माझ्यातच मी हरवून गेलो. मनापासून लिहिलेल्या त्या ओळी, अडगळीत त्या वहीत कुठेतरी पुसट होत चालल्या होत्या. क्षणभर मीही पुन्हा त्या जुन्या आठवणीत हरवून गेलो आणि नकळत जुन्या क्षणाना पुन्हा आपलस म्हणू लागलो पण तिथेच मन क्षणभर सावध झालं आणि पुन्हा मला वर्तमानात घेऊन आल.
अस म्हणतात जूनं जितक दिसायला सुंदर असत तितकच ते वेदना सुद्धा देत आणि म्हणूनच की काय कित्येक वेळा जून आठवलं की आपसुक डोळ्यातून पाणी येतं. कधी आनंदाचे तर कधी दुःखाचे सुद्धा. म्हणूनच जुन्या वहीच पान उघडताना तेवढचं सावधही असाव लागत. कारण त्यात किती वाहत जायचं हे आपणच आधी ठरवावं लागत, नाहीतर आठवाचा पाऊस पडायला लागल्यावर भिजण्या शिवाय पर्याय नसतो. म्हणूनच मी हल्ली जुन्या आठवणींन पासून जरा दूरच असतो पण ती आठवण जर अचानक समोर आली तर मात्र त्याला काही पर्याय नसतो.
माणूस नजरेला बंधन घालू शकतो, पण मग मनाच काय? असाही प्रश्न कधीकधी पडतो आणि सगळच चित्र बदलायला लागत. कारण नकळत मग नजरे समोर एखादी आठवण आलीच तर काय करायच?? जर आठवण सुंदर असेल तर तिला पुन्हा जगायचं आणि आठवण वाईट असेल तर काही घडलच नाही अस समजून पुढे निघायच. पण आता काही म्हणतील इतक सोप असत पुन्हा त्या आठवणीला दुर्लक्ष करण. पण अवघडही नसत हेही खरं. पण सुंदर आठवणीं सोबत जगताना आयुष्य सुंदर होत आणि पुढेही त्या आठवणी आनंदच देऊन जातात.
धुळीत पडलेली ही वही मला पुन्हा आठवणीत घेऊन गेली खरी पण आजच्या क्षणांची सुद्धा आठवण देऊन गेली. कधी काळी सोडून दिलेल्या गोष्टी पुन्हा मी आयुष्यात तर घेऊन येत नाही ना?? याचीही जाणीव मला त्या वहीने दिली. कारण कालानुरूप आयुष्यातून काही गोष्टी सोडल्या, निघून गेल्या, जपल्या, आठवणीत ठेवल्या आणि वहीत कुठेतरी कायमच्या बंद करून टाकल्या. मग पुन्हा ती धुळ झटकायला हवी का?? माझ मन मला सतत विचारत होत आणि मी मात्र एकटक त्या वहीकडे पाहत होतो.
✍️योगेश
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply